वाशिम :- “मतदार यादी जितकी अचूक आणि अद्ययावत, तितकी लोकशाही अधिक सक्षम होते. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, जिल्हाभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. गणना प्रपत्र भरून घेण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, पात्र मतदारांची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी विविध भागांना भेटी देऊन मोहिमेचा आढावा घेत असून आवश्यक सूचना देत आहेत.
मोहिमेदरम्यान बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन अचूक माहिती द्यावी तसेच प्रपत्रातील माहितीची खातरजमा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करावयाची आहे, त्यांच्यासाठी ईसीआयनेट (ECINET) ॲप तसेच https://voters.eci.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. या माध्यमातूनही गणना प्रपत्र भरता येत असून आवश्यकतेनुसार संबंधित बीएलओ किंवा मतदार नोंदणी कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळू शकते.
अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असून, प्रत्येक पात्र मतदाराने यात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला बळकटी द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

