👉 घरकुल योजनेत मोठा डल्ला;
👉 रमाई पाठोपाठ पीएम आवासचा ही भ्रष्टाचार येणार चव्हाट्यावर…..
वाशिम जि. प्रति :-
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गरिबांना हक्काचे घर देण्याचे स्वप्न शासन दाखवत असले तरी, प्रशासकीय स्तरावर मात्र भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील एका लाभार्थ्याच्या नावावर घरकुलाचे दोन हप्ते चक्क दुसऱ्याच खात्यात वळवून ८५ हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित लाभार्थ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम व मालेगावचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
किन्हीराजा येथील रहिवासी विकास दत्ताप्पा परांडकर यांच्या पत्नी सौ. जयश्री विकास परांडकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थी आयडी: MH133548729 नुसार घरकुलाच्या कामासाठी त्यांनी चौकशी केली असता, त्यांच्या नावावर घरकुलाचे १५,००० आणि ७०,००० असे एकूण ८५,००० रुपये आधीच वितरित झाल्याचे दिसून आले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम परांडकर कुटुंबाच्या कोणत्याही बँक खात्यात जमा झालेली नाही.
कागदपत्रांची हेराफेरी आणि अफरातफर?
लाभार्थ्याच्या दाव्यानुसार, त्यांच्या पत्नीच्या नावाच्या कागदपत्रांमध्ये बनावट पद्धतीने बदल करून, हा निधी तिसऱ्याच बँक खात्यात वळवण्यात आला आहे. घरकुलाचा हा पैसा नेमका गेला कुठे? आणि लाभार्थ्याची स्वाक्षरी किंवा संमती नसताना ही रक्कम कशी उचलली गेली? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यामध्ये संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमाई आवास योजनेतील 2 कोटी 52 लक्ष रुपयांचा अपहार चांगलाच गाजत असताना आता पी. एम. आवास योजनेतील भ्रष्टाचाराचे धागे दोरे जिल्हातील मुख्य कार्यालयातून हालत असल्याचे बोलल्या जात आहे.

