कन्या जन्म गौरव, अनाथ प्रमाणपत्रे, कर्ज धनादेश व बियाण्यांचे वितरण
वाशिम : – महिला व बालविकास भवन ही केवळ प्रशासकीय इमारत नसून महिलांच्या आशा, विश्वास आणि सक्षमीकरणाचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पीडित, गरजू व त्रस्त महिलेला तातडीने मदत, न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महिला व बालविकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे,असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी केले. वाशिम येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बालविकास भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. 
यावेळी मंत्री ना. तटकरे यांच्या हस्ते फीत कापून महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भवनातील विविध कक्षांची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास आमदार श्याम खोडे, आमदार सईताई, विधानपरिषद सदस्य आमदार किरणराव सरनाईक, आमदार भावना गवळी, नगराध्यक्ष अनिल केंदळे, महिला व बालविकास आयुक्त वर्षा लढ्ढा, महिला व बालविकास उपायुक्त चौधरी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय बिरारीस, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात ना. तटकरे पुढे बोलतांना म्हणाल्या की, लिंगभेदमुक्त समाज घडविण्यासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान अधिक व्यापकपणे राबविणे आवश्यक आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, कुपोषणमुक्त जिल्हा घडविणे, महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, आहार समित्यांच्या नियमित बैठका, अंगणवाडी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि आदिशक्ती समित्यांच्या प्रभावी कार्यावर विशेष भर देण्यात यावा. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अहिल्याभवनातील हिरकणी कक्ष तळमजल्यावर स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच माविमच्या माध्यमातून महिला बचतगट अधिक सक्षम करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना आता एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने महिलांना विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. या भवनामुळे सेवा वितरण अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल. जिल्हा प्रशासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून या वास्तूमधून लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार श्याम खोडे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने उभारलेले महिला व बालविकास भवन ही महत्त्वपूर्ण सुविधा असल्याचे सांगितले. विविध योजना एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे महिलांना जलद व प्रभावी सेवा मिळेल आणि त्यांचे सक्षमीकरण अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.
आमदार किरणराव सरनाईक यांनी कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिमच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलगी जन्माला आलेल्या पाच कुटुंबांचा कन्या जन्म गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. निवडक लाभार्थ्यांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण, महिला बचतगटांच्या पतसंस्थांमार्फत कर्ज धनादेशांचे वाटप तसेच परसबाग लागवडीसाठी बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी प्रास्ताविकात महिला व बालविकास भवन उभारणीची पार्श्वभूमी, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध महिला व बालकल्याण योजनांची माहिती तसेच या नव्या वास्तेमुळे नागरिकांना होणाऱ्या सुविधांची माहिती दिली. महिला व बालविकास विभागाच्या सर्व सेवा, विविध योजनांचे मार्गदर्शन, महिला संरक्षण व सक्षमीकरणाशी संबंधित कामकाज अधिक परिणामकारकपणे आणि एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिला, बालक व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले.
यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या सदस्या, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास ,महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

