वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम माळशेलू येथील शेतकरी जनार्दन भगत यांच्या शेतातून अज्ञात चोरांनी ५० हजार रुपये किमतीचे कृषी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशेलू येथील रहिवासी जनार्दन भगत यांचे शिवारामध्ये शेत आहे. त्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात सोलर पंप पाईप मोटर पंप आणि बोरिंगचे पीव्हीसी पाईप बसवले होते. दि. 23/8 च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश करून सोलर पंप पाईप बोरिंगचे पीव्हीसी पाईप आणि पाण्याचा मोटर पंप असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
सकाळी जनार्दन भगत हे शेतात गेले असता त्यांना हा चोरीचा प्रकार समजला. शेतातील साहित्य चोरीला गेल्याने त्यांचे ५० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत जनार्दन भगत यांनी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

