वाशिम,
श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या पावन निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दि. (१४) रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र Poharadevi येथे भेट देत संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण दर्शन घेतले.
या वेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार धर्मगुरु बाबुसिंग महाराज, विविध महंतगण, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धा, संस्कार आणि जनसेवेचा निर्धार
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संतांच्या विचारांचा समाज घडविण्यातील मोलाचा वाटा अधोरेखित करताना सांगितले की, संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराजांनी दिलेला सत्य, अहिंसा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश आजही मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. “संतांनी दाखविलेल्या मार्गावर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे भावनिक शब्दांत नमूद केले की, “संतांच्या चरणी नतमस्तक होताना जनतेच्या कल्याणाचीच प्रार्थना मनात असते. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब सुखी, सुरक्षित आणि समृद्ध व्हावे, हीच आमची बांधिलकी आहे.”
पोहरादेवी – श्रद्धा आणि विकासाचा संगम
पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेचे केंद्र असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व्यवस्था, स्वच्छता आणि मूलभूत सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“परंपरा जपत विकासाचा वेग वाढवणे, हीच खरी संतसेवा आहे,” असे म्हणत त्यांनी श्रद्धा आणि विकासाचा संगम घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
जनतेशी भावनिक नातं
कार्यक्रमाच्या वेळी हजारो भाविक, समाजबांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संतांच्या जयघोषात आणि भक्तिभावाच्या वातावरणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
संतांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र अधिक सक्षम, समृद्ध आणि एकसंघ होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जनतेशी असलेले आपले भावनिक नाते अधिक दृढ केले.

