- वाशिम :- मंगरुळपीर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये श्री गोविंद विद्यालय, पार्डी ताड ता. मंगरुळपीर येथील खेळाडूंनी आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर मैदान गाजवले. विद्यालयाच्या ८ हुशार मुला-मुलींनी विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत यशाचे ‘अष्टविनायक’ म्हणून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुलींचा मैदानावर दबदबा !
मैदानी स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. १४ वर्षांखालील (U-14) गटात कु. अंकिता दत्ता ठाकरे हिने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली गती दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्षांखालील (U-17) गटात कु. सानिका दत्ता पानभरे हिने १०० मीटर धावण्यात अव्वल स्थान मिळवले.उडी मारण्याच्या प्रकारात कु. लक्ष्मी राजू खोरणे हिने १४ वर्षांखालील (U-14) गटात लांब उडी आणि उंच उडी अशा दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी मुकुट पटकावला. १७ वर्षांखालील (U-17) गटात कु. श्रावणी परमेश्वर मिरासे हिने देखील आपल्या अष्टपैलू कौशल्याचे प्रदर्शन करत भालाफेक आणि उंच उडी या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय, १४ आणि १७ वर्षांखालील (U-14 & U-17) ४*१०० मीटर रिले धावण्याच्या स्पर्धेत मुलींच्या संघाने उत्कृष्ट ताळमेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.

- मुलांचीही सुवर्ण भरारी !
- मुलांनीही मैदानावर आपली ताकद आणि चपळता सिद्ध केली. गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेत ओम गोपाल तायडे याने आपल्या ताकदीच्या आणि अचूकतेच्या जोरावर दोन्ही खेळात प्रथम क्रमांक मिळवून वर्चस्व गाजवले.लांब उडीच्या १४ वर्षांखालील (U-14) गटात जय गजानन लांभाडे याने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्षांखालील (U-17) गटात अभिषेक दिपक मुखमाले याने उत्कृष्ट उडी मारत प्रथम स्थानावर आपले नाव कोरले. उंच उडीच्या १४ वर्षांखालील (U-14) गटात ईश्वर गुणवंता लांभाडे याने आपल्या चपळतेने सर्वांना अचंबित करत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य..
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशामागे संस्थेचे सचिव शरद ठाकरे, मुख्याध्यापक श्याम ठाकरे आणि क्रीडा प्रशिक्षक महादेव बोरकर यांचे अहोरात्र घेतलेले परिश्रम आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्था चालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींकडून हार्दिक अभिनंदन केले जात असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

