- वाशिम जि. प्रति – जिल्हातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम नंधना येथील
शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबावर आणि कष्टावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची एक संतापजनक घटना शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. नंधाना परिसरातील तब्बल ८ शेतकऱ्यांच्या शेती साहित्यासह महावितरणच्या तारांवर चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डल्ला मारला. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून,
चोरट्यांची हिंमत एवढी वाढली आहे की, त्यांनी थेट शेतातील चारही पोलवरील विद्युत वाहिनीचे ६०,००० रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे तार तोडून पळवून नेले. यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. - *८ शेतकऱ्यांची लूट: कोणाचे काय गेले?*
- अज्ञात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकाच रात्रीत खालील शेतकऱ्यांचे साहित्य लंपास केले:
- * सचिन पुरी: १०० फूट केबल आणि १ स्टार्टर
* भारत देशमुख: २०० फूट केबल आणि जुने टोकन यंत्र
* संजय बोरकर: २१० फूट केबल आणि १ स्टार्टर
* संजय मोरे: टोकन यंत्र आणि १०० फूट केबल
* संजय दाभाडे: २०० फूट केबल आणि ९ स्प्रिंकलर तोट्या
* गजानन आवचार: ५० फूट केबल
* शिवाजी बोरकर: दोन स्टार्टर आणि १०० फूट केबलवर चोरट्यानी डल्ला मारण्यात यशस्वी झाले.
महावितरणच्या तारा आणि शेतकऱ्यांचे साहित्य मिळून एकूण ८४,४०० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरडे या चोरीमुळे पुरते मोडले आहे. ऐन हंगामात शेती साहित्य चोरीला गेल्याने शेतीची कामे कशी करावीत, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
या घटनेमुळे शिरपूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरटे राजरोसपणे शेतात घुसून पोलवरील तारा तोडतात, केबल कापतात आणि पोलीस ढिम्म राहतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते.
शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ चोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

