वाशिम :- वाशीम महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू असलेल्या आंदोलनाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे कंत्राटी कामगारांनी दि. 24 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे आंदोलनकर्त्या कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. आज दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी दोन कंत्राटी कामगारांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सामान्य रुग्णालय, वाशिम येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे.
कंत्राटी कामगारांनी अनेक वर्षे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष तांत्रिक सेवा बजावली आहे. उपकेंद्रे, वीजपुरवठा व्यवस्था, देखभाल-दुरुस्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत सेवा देताना या कामगारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र दीर्घकाळ सेवा करूनही त्यांच्या सेवासुरक्षा, रोजगाराची स्थिरता आणि न्याय्य सेवाशर्तींबाबत प्रश्न प्रलंबित असल्याचा कामगारांचा आरोप आहे.
“न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्या कंत्राटी कामगारांनी व्यक्त केला आहे.
कामगारांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला दि. 30 ऑगस्ट 2026 पर्यंत सकारात्मक व ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा परिस्थिती अत्यंत गंभीर टप्प्यावर जाऊ शकते, असा इशारा कामगारांनी दिला असून, आंदोलनकर्त्यांनी दि. 31 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे व त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितल्याचे कळविले आहे.
प्रमुख मागण्या
1. कंत्राटी कामगारांच्या दीर्घकालीन सेवेला न्याय देऊन अनेक वर्षे सेवा केलेल्या पात्र कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यात यावे.
2. वेतनविषयक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी.
कंत्राटी कामगारांच्या संयमाची परीक्षा घेण्याऐवजी प्रशासन व शासनाने तातडीने तोडगा काढावा. दोन कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावे लागणे ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,
प्रभाकर लहाने
राज्याध्यक्ष
तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन

