वाशिम :- शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात मोठा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी / भूमिहीन शेतमजूर / महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ नव्या आणि अधिक व्यापक स्वरूपात लागू केली आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेत आता ७/१२ धारक शेतकऱ्यांसह ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणीकृत भूमिहीन शेतमजूर आणि प्रमाणपत्र प्राप्त महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षेचे भक्कम कवच उपलब्ध झाले आहे.
या योजनेअंतर्गत शेतातील अथवा इतर कोणत्याही अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळे, दोन हात अथवा दोन पाय निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹२ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाणार आहे. तसेच एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास ₹१ लाख रुपयांची मदत थेट लाभार्थ्याच्या किंवा वारसदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यापूर्वी ही योजना कुटुंबातील केवळ दोन व्यक्तींपुरती मर्यादित होती; मात्र आता १० ते ७५ वर्षे वयोगटातील आई-वडील, पती-पत्नी, मुलगा आणि अविवाहित/घटस्फोटित/विधवा मुलींसह कुटुंबातील सर्वच पात्र सदस्यांना या योजनेचे संरक्षण मिळणार आहे.
या योजनेंतर्गत रस्ता अथवा रेल्वे अपघात, वीज पडून मृत्यू, विजेचा धक्का, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांचा हल्ला, पाण्यात बुडणे, उंचावरून पडणे, विषबाधा, उष्माघात, नक्षलवादी हल्ला, बाळंतपणातील मृत्यू आणि दंगलीतील अपंगत्व अशा विविध आकस्मिक घटनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, अंमली पदार्थांच्या अमलाखाली झालेले अपघात, कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात आणि मोटार शर्यतीतील अपघात या बाबी योजनेच्या लाभातून वगळण्यात आल्या आहेत.
अपघात घडल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत सर्व आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची माहिती, पात्रता आणि अर्जाच्या प्रक्रियेसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

