वाशिम :- मालेगाव तालुक्यातीलदुबळवेल क्षेत्रातील रेल्वे पटरीच्या बाजूला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले असून, मृतक लातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पटरीच्या बाजूला एक अनोळखी इसम मरण पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस स्टेशन जऊळका येथील ठाणेदार गणेश हिवरकर, पोहेकॉ विनोद दामोदर, गजानन काटेकर, पोकॉ विष्णू इंगळे, गोपाळ कव्हर आणि तुकाराम उगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. या शोधमोहिमेत दुबळवेल येथील स्थानिक युवक विकास सावंत, संतोष लबडे, साहेबराव पोकळे, गणेश लबडे, भवानी पोफळे, राहुल लबडे, मंगेश वाघमारे, सुनील गवई तसेच वाशिम येथील ‘मो. सरकार सैलानी ट्रक मालक चालक असोसिएशन’चे मोलाचे सहकार्य लाभले.
सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मृतकाची ओळख पटली. जलील अब्बास शेख (वय ३९ वर्षे, रा. भाडगाव, ता. जि. लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद दामोदर हे करीत आहे.
नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी जऊळका पोलिसांच्या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले. “अशा कठीण प्रसंगात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सहकार्य यामुळेच मृतदेहाची ओळख पटू शकली,” अशा भावना व्यक्त करत नातेवाईकांसह सर्व नागरिकांनी जऊळका पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

