वाशिम : – राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता अॅग्रीस्टॅक नोंदणीची खात्री करून आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
राज्य शासनाने दिनांक २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर वाशिम जिल्ह्यातील ६९४ गावांतील एकूण ५२ हजार ८८१ पात्र खातेदारांची यादी उपलब्ध झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न सेवा सहकारी संस्थांतील २९ हजार ८५६ तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांतील २३ हजार २५ खातेदारांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पात्र लाभार्थी खातेदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : वाशिम – १४ हजार १६५, रिसोड – ११ हजार ८७९, मालेगाव – ५ हजार ६४७, मंगरुळपीर – ६ हजार ३०२, कारंजा – ७ हजार ४१४ आणि मानोरा – ७ हजार ४७४.
पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या संबंधित गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा संस्था कार्यालय तसेच बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावाची खात्री करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ झाले आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज खात्याचे पासबुक आणि बँक खात्याचे पासबुक सोबत घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची मंजूर रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रावर तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. तसेच कर्जमुक्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम एम. एस. लटपटे यांनी केले आहे.

