घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर
कारंजा व रिसोड तालुक्यात तहसील पथकाची धडक कारवाई
वाशिम :- घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कारंजा शहरात तहसील प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करत विविध हॉटेल्स, चहा-नास्ता केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेत एकूण २६ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. अचानक टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले असून संबंधितांकडून सिलिंडर जप्त करण्यात आले.
तपासणीदरम्यान हॉटेल अखंड अमृततुल्य (मानोरा रोड, कारंजा), चहा आणि मी (झाशी राणी चौक, कारंजा) आणि कुटुंब हॉटेल (मंगरूळपीर रोड, कारंजा) या तीन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणांवर कारवाई करून संबंधितांकडील सिलिंडर जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी स्मिता नायगावकर, मंडळ अधिकारी महेश धानोरकर, ग्राम महसूल अधिकारी अर्चना चिकटे, राहुल वरघट तसेच सागर राऊत आणि तुषार श्रीरामे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, अवैध गॅस सिलिंडरचा वापर रोखण्यासाठी रिसोड तालुक्यातील हॉटेल, धाबे व उपहारगृहांचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान निरीक्षण अधिकारी गणेश तांगडे, हावगीराव गंगनर आणि चेतन जाधव यांनी कारवाई केली. सवड येथील न्यू साई हॉटेल येथे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठिकाणाहून सिलिंडर जप्त करण्यात आला.सदर कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करण्याचे नियम असून त्याचा व्यावसायिक वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

