जिल्हा युवा अधिकारी यांचे आवाहन
वाशिम :-
मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वाशिम कार्यालयामार्फत युवकांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांना अर्थसंकल्पाची समज विकसित व्हावी आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम क्विझ स्पर्धा व नोंदणी मोहिमेच्या स्वरूपात बहु-स्तरीय आणि सहभागी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ स्पर्धा होणार असून १७ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केली जाणार आहे.
सहभागी होण्यास इच्छुक युवकांनी माय भारत पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची निवड राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश स्तरावर निबंध लेखन स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. या टप्प्यात सहभागी युवकांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मधील प्रमुख विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवड झालेल्या युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पावर धोरणकर्ते व मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये धोरणांविषयीची समज, जागरूकता आणि सहभाग अधिक दृढ होणार आहे.
‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ हा उपक्रम युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाशी जोडणारा एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी प्रयत्न असून जिल्ह्यातील सर्व युवकांनी १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत माय भारत पोर्टलवर नोंदणी करून मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत वाशिम यांनी केले आहे.

