पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन
वाशिम :-
लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा २०१२ अंतर्गत लैंगिक शोषण झालेल्या किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांना मदत करण्यासाठी सहाय्यक व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी बालकांच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले आहे.
पॉक्सो कायदा हा १८ वर्षाखालील बालकांवरील लैंगिक शोषण व पोर्नोग्राफीपासून संरक्षणासाठी लागू करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक, सामाजिक व कायदेशीर आधार देण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. या पार्श्वभूमीवर बालकांच्या क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सहाय्यक व्यक्ती म्हणून काम करणे आवश्यक आहे.
पात्रता :
सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बाल विकास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली व्यक्ती तसेच बालशिक्षण व विकास संरक्षण क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असलेली पदवीधर व्यक्ती अर्ज करू शकतात. बाल हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या संस्था, तसेच बालगृह किंवा निवारा गृहाशी संबंधित अधिकारीही सहाय्यक व्यक्ती म्हणून अर्ज करण्यास पात्र असतील.
निवड प्रक्रिया :
अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्जांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर निवड समितीसमोर वैयक्तिक संवादाद्वारे मूल्यांकन करून पात्र उमेदवारांची सहाय्यक व्यक्ती म्हणून शिफारस केली जाईल.
मानधन :
सहाय्यक व्यक्तींना रुग्णालय, बाल कल्याण समिती, पोलिस ठाणे, बालसंगोपन संस्था, न्यायालय, शैक्षणिक संस्था व इतर संबंधित ठिकाणी केलेल्या कामकाजाच्या दिवसांनुसार मानधन देण्यात येईल. हे मानधन किमान वेतन कायदा १९४८ अंतर्गत कुशल कामगारासाठी निर्धारित दरानुसार अदा केले जाईल. मात्र, नियुक्ती असूनही कोणतेही प्रकरण दिले नसल्यास मानधन देण्यात येणार नाही.
अर्ज सादर करण्याची मुदत
सहाय्यक व्यक्ती म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कक्ष क्र. २०४, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

