वाशिम :- वाशीमकरांचा लाडका बाल समुपदेशक व लेखक म्हणून ओळख असलेल्या अवघ्या १२ वर्षीय विराज शिंदे याची ५३ व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनासाठी (दिव्यांग श्रेणी) निवड झाली आहे. ही निवड वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
श्री. ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, कोंडाळा महाली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वाशिमचे बहुपरिचित विधानपरिषद सदस्य किरणराव सरनाईक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्या हस्ते विराजला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
विशेष म्हणजे, विराजची इन्स्पायर नॅशनल साठी यापूर्वीच निवड झाली आहे.
मेडिकल ट्रीटमेंट, सर्जरी अशा अनेक अडचणींवर मात करत आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे जाता येते, हे विराजने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. सायन्स, मॅथ, विविध स्पर्धा परीक्षा, कला, संगीत आणि खेळ अशा सर्वच क्षेत्रांत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आय.एस.टी.एस.ई. या प्रतिष्ठित टॅलेंट स्पर्धेत विराजने आंतरराष्ट्रीय क्रमांक ९ मिळवला आहे. ई.आय. असेट या नॅशनल टॅलेंट स्पर्धा परीक्षेत त्याला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. रामानुज मॅथ चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यावर्षी त्याने राष्ट्रीय क्रमांक ११ पटकावला आहे. तसेच एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत त्याला अ श्रेणी प्राप्त झाली आहे.
विराजने सायन्सवर आधारित तयार केलेली दोन्ही मॉडेल्स समाजाच्या हितासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. या यशामागे समन्वयक विजय भड व भास्कर सर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे मत विराजने नमूद केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विराजचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

