आजच्या ग्रामीण वास्तवात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्या तरी मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यशाची नवी वाट तयार करता येते. पशुपालन हा केवळ जोडधंदा न राहता शाश्वत उत्पन्नाचा मजबूत आधार ठरू शकतो, हे रिसोड तालुक्यातील चिखली येथील संदिप कुंडलिक काळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
👉 संभ्रमातून उमलले स्वप्न
0शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात संदिप यांच्या मनात अनेक प्रश्न होते. अनुभवाचा अभाव, आर्थिक मर्यादा आणि अनिश्चित भविष्य असूनही त्यांनी हार मानली नाही. शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी ठोस, टिकाऊ आणि स्वावलंबन देणारे करायचे, या विचारातून शेळीपालनाची कल्पना आकार घेऊ लागली आणि त्यातूनच नव्या प्रवासाची सुरुवात झाली.
👉मार्गदर्शनाचा आधार
सुरुवातीला काय करावे, कसे करावे, कुठून सुरुवात करावी, या सगळ्या प्रश्नांनी गोंधळ उडाला होता. याच टप्प्यावर पशुसंवर्धन विभागातील पशु वैद्यकीय दवाखाना, चिखली येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. सतीश खरात यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य जात निवड, शेडची रचना, चारा व्यवस्थापन आणि आरोग्य काळजी या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या सल्ल्याने आत्मविश्वास वाढत गेला.
👉अल्प भांडवल, मोठी जिद्द
शेळीपालन सुरू करताना भांडवल ही मोठी अडचण होती. बँकेकडून एक लाख पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेतले. उपलब्ध साधनसामग्रीतून साधे पण उपयोगी शेड उभारले. अर्धा एकर क्षेत्रावर मका पेरला, नेपियर गवताची लागवड केली. शेतातील तुरी व हरभऱ्याचे कुटार साठवून चाऱ्याची गरज भागवली.
👉 शास्त्रीय व्यवस्थापनाची जोड
मार्गदर्शनानुसार राजस्थान येथून सिरोही जातीच्या दहा शेळ्या व एक बोकड खरेदी करण्यात आला. सुरुवातीला हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्याने वाळलेला चारा, कुटार आणि झाडपाला वापरण्यात आला. अनुभव वाढत गेला तसे नेपियर, बाहुबली व्ही–१२, बिल्डर्स बाबू दशरथ, मेथीघास, कृष्णा घास, हादगा अशा विविध चाऱ्यांची लागवड करण्यात आली.
👉 काळजीपूर्वक संगोपन
पशु वैद्यकीय दवाखान्यामार्फत सर्व शेळ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली. नियमित जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन तसेच अंत्रविषार, घटसर्प, पीपीआर यांसारख्या रोगांवरील लसीकरण करण्यात आले. गोठ्याची नियमित स्वच्छता व फवारणी केली जाते.
सकाळ-संध्याकाळ वाळलेला चारा, दुपारी हिरवा चारा दिला जातो. गाभण बकऱ्यांसाठी विशेष आहार दिला जातो. नवजात करडांसाठी स्वतंत्र जाळीदार शेड उभारून प्रेमाने आणि काळजीने संगोपन केले जाते.
👉 शाचा आलेख वर चढताना
योग्य व्यवस्थापनामुळे शेळ्यांची वाढ उत्तम झाली. अवघ्या चौदा महिन्यांत प्रत्येक शेळी दोन वेळा व्याली. संख्या साठ ते पासष्टपर्यंत पोहोचली. जागेअभावी टप्प्याटप्प्याने सत्तेचाळीस शेळ्यांची विक्री करण्यात आली. यातून दोन लाख तीस ते दोन लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले.
सध्या सुमारे पंचवीस हजार रुपये मासिक उत्पन्न शेळीपालनातून मिळत असून घरखर्च भागवूनही बचत होत आहे. शून्यातून उभा राहिलेला हा व्यवसाय आज कुटुंबाचा भक्कम आधार बनला आहे.
👉प्रेरणादायी ठसा
या यशस्वी वाटचालीमुळे गावातील इतर शेतकरी व तरुण शेळीपालनाकडे आशेने पाहू लागले आहेत. पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून अनेक जण या व्यवसायात पाऊल टाकत आहेत. गावात स्वावलंबनाची नवी चळवळ उभी राहत आहे.
मनातून उमटलेला संदेश
‘शून्यापासून सुरुवात केली तरी ठाम निश्चय आणि मेहनतीची तयारी असेल तर यश दूर नसते. अल्प भांडवलातही योग्य नियोजन आणि मार्गदर्शन मिळाल्यास पशुपालनातून निश्चित यश मिळू शकते’.
👉 उद्याची दिशा
पुढील काळात शेळीपालन व्यवसाय दोनशे ते अडीचशे शेळ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्धार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत मार्गदर्शन सुरू असून, भविष्यात तीन एकर चारा लागवड, कडबा कटर यंत्र आणि नवीन शेड उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे.
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

