वाशिम :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता १ लीमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून विनामूल्य प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयात तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये उपलब्ध आहेत. नागरिकांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता अथवा कोणाच्या माध्यमातून अर्ज प्राप्त न करता संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधूनच अर्ज प्राप्त करावेत व सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पूर्वी दि. १० मे २०२६ होती. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुदतवाढ देण्यात आली असून आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. २५ मे २०२६ अशी राहणार आहे.
प्रवेशासाठी आवश्यक अटी व शर्ती
• विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
• सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
• पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या आत असावे व तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक राहील.
• इयत्ता १ लीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय किमान ६ वर्षे पूर्ण असावे.
• प्रवेश अर्जासोबत पालकांचे संमतीपत्र व विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे.
• आदिम जमातीतील विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या व दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
• विद्यार्थ्यांचे पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत.
• विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक राहील.
• एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलता येणार नाही.
• अपूर्ण कागदपत्रे अथवा खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
ही माहिती मोहनकुमार व्यवहारे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी दिली आहे.

