अनसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई
वाशिम :-
महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाव अभियान तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, १९९४ च्या कठोर अंमलबजावणीअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, वाशिम कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, वाशिम यांच्या सहकार्याने अनसिंग, येथे धडक कारवाई केली. या कारवाईत दोन गंभीर प्रकरणे उघडकीस आली.
प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे. आई मेडिकल स्टोअर, अनसिंग येथे डमी ग्राहक पाठविण्यात आला.
गर्भपातासंदर्भातील औषधांची मागणी केल्यानंतर कोणतेही वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन न पाहता औषधांची विक्री केल्याचे आढळून आले. औषध निरीक्षकांनी तपासणी केली असता गर्भपात औषध किटचा साठा मिळून आला. या साठ्याच्या खरेदी-विक्री संदर्भातील कोणतीही वैध नोंद, पावती अथवा साठा नोंदवही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. सदर औषधे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून नमुने शासकीय औषध विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
यानंतर संशयाच्या आधारे सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खडसिंगी-अनसिंग परिसरात तपासणी केली. या तपासणीदरम्यान वेग्रा-१०० मि.ग्रॅ. (सिल्डेनाफिल सायट्रेट) ही कामोत्तेजक स्वरूपाची ऍलोपॅथिक औषधे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवून ठेवलेली आढळून आली. एकूण २५३ पट्ट्या (प्रत्येकी चार गोळ्या) असा साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत २० हजार ४४८ आहे. सदर साठा कोणत्याही वैध औषध विक्री परवान्याशिवाय ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
गर्भपाताच्या औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच बेकायदेशीर कामोत्तेजक औषध साठा हे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारे व गंभीर दंडनीय गुन्हे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड व अवैध औषध व्यवहारांविरोधात प्रशासन शून्य सहनशीलता धोरण अवलंबत असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन, वाशिम यांनी दिला आहे.

