वाशिम ;-
सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, सुरक्षित व जबाबदार बँकिंगची सवय लागावी, या उद्देशाने वित्तीय साक्षरता सप्ताह २०२६ चे आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. ‘सुरक्षित बॅंकिंग की ओर पहिला कदम’ या संकल्पनेवर आधारित या सप्ताहाचा शुभारंभ जनजागृती प्रचार डिजिटल चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूरचे विकास अधिकारी हर्षल चितळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहाय्यक संचालक पंकज दिनवले, बँक ऑफ महाराष्ट्र वाशिमचे अमित वढेरा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मंगेश बोडाल्डे, बँक ऑफ इंडियाचे अविनाश सरकटे तसेच आयसीआयसीआय बँकेचे रूपेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
वित्तीय साक्षरता सप्ताहाच्या माध्यमातून सुरक्षित बँकिंग व्यवहार, डिजिटल आर्थिक व्यवहारांतील खबरदारी, सायबर फसवणूक प्रतिबंध, बचत व आर्थिक नियोजन याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रचार रथाच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात जाऊन नागरिकांपर्यंत वित्तीय साक्षरतेचा संदेश पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

