१६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
वाशिम,:-
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनामार्फत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याची विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर, त्यासोबत कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत ३.५० लाखांपर्यंत खर्चास मान्यता असून त्यामधून ९० टक्के म्हणजेच कमाल ३.१५ लाख इतके शासकीय अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित १० टक्के रक्कम स्वयंसहाय्यता बचत गटाने स्वहिस्सा म्हणून भरावयाची आहे.
शासनाने मंजूर केलेली रक्कम थेट लाभार्थी बचत गटांच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा केली जाणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे, तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव देखील याच घटकांतील असणे बंधनकारक आहे.
सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
लाभार्थी बचत गटांना शासनाने निश्चित केलेल्या मान्यताप्राप्त उत्पादकाकडूनच ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी करावी लागणार आहे. जर जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज आले, तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. ज्या बचत गटांनी किंवा सदस्यांनी यापूर्वी पावर टिलर अथवा मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ मिळणार नाही.
इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी विहित नमुन्यात अर्ज दि. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम या कार्यालयात सादर करावेत. अर्जासोबत बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पियूष चव्हाण यांनी केले आहे.

