महिला मतदारांचा कौल ठरणार निर्णायक; सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान
वाशिम :- तालुक्यातील मौजे ब्रम्हा, येथे असलेल्या ऋषी रेस्टॉरंट अॅण्ड बाईन बार यांची मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करावी अथवा नाही, याबाबत दारूबंदी निवडणूक घेण्यात येणार असून, ही निवडणूक दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिलेल्या आदेशान्वये सदर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी वाशिम तहसिलदार निलेश पळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच तहसिलदार, वाशिम यांचे आदेश क्रमांक जा.क्र. म.स./सा.नि./कावि/२४/२०२६, दिनांक २३ जानेवारी २०२६ अन्वये नायब तहसिलदार, ही.एस.आडे यांना निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली आहे.
मतदान केंद्रांचा तपशील
३४ – वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील
मतदार यादी भाग क्र. ३३० व मतदान केंद्र क्र. १ मधील मतदारांसाठी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. १ (पूर्वेकडील भाग)
मतदार यादी भाग क्र. ३३१ व मतदान केंद्र क्र. २ मधील मतदारांसाठी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. २ (पूर्वेकडील भाग)
मतदान व मतमोजणी
मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील.
मतमोजणी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्रम्हा येथे होणार असून, निकाल तात्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
महिला मतदारांचा अधिकार
शासन राजपत्रातील तरतुदीनुसार, दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील (भाग क्र. ३३० ते ३३१) नाव समाविष्ट असलेल्या महिला मतदारांनाच या मतदानात सहभागी होता येणार आहे.
सदर यादीतील एकूण महिला मतदारांच्या किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास, ग्रामपंचायत ब्रम्हा हद्दीतील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत.
सदर मतदानासाठी वापरण्यात येणारी मतपत्रिका शासन राजपत्रातील परिच्छेद ९ मध्ये नमूद नमुन्यानुसार असणार आहे.असे निवडणूक नायब तहसिलदार तथा प्राधिकृत अधिकारी सी.एस.आडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

